ॲमेझॉनफ्लिपकार्ट वरील
अधिकृत पुस्तक वितरक

‘संगणक प्रकाशन’ विषयी…

ॲमेझॉन वा फ्लिपकार्ट वर पुस्तके खरेदी करणाऱ्या वाचकांना ‘संगणक प्रकाशन’ हे नाव नवे नाही. ‘संगणक’ ने १५० हून अधिक ख्यातनाम प्रकाशकांची अक्षरशः हजारो पुस्तके ‘ॲमेझॉन’ – ‘फ्लिपकार्ट’ वर उपलब्ध केली आहेत. ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी ‘संगणक प्रकाशन’ हे पूर्ण विश्वासार्ह असे नाव आहे.

‘संगणक प्रकाशन’ ची स्थापना व पार्श्वभूमी

‘संगणक प्रकाशन’ ची स्थापना १९९९ साली म्हणजे २२ वर्षांपूर्वी एका विशिष्ट ध्येयाने झाली. त्या काळी संगणकाचे हार्डवेअर आणि इंटरनेट सामान्यांसाठी महागडेही होते, आणि त्याचे तंत्रज्ञान शिकणे वा समजणे अवघडही होते. तंत्रज्ञान शिकण्यासाठी तेव्हा उपलब्ध असलेली पुस्तके मुख्यत्वे इंग्रजीत असत. मराठी वाचकाला सोप्या मराठी भाषेतून समजावत संगणकाचे तंत्रज्ञान शिकवणारी मराठी पुस्तके ही तेव्हाची गरज होती. पण बाजारात संगणकीय तंत्रज्ञान शिकवणारी मराठी पुस्तके फारच दुर्मिळ होती. संगणक प्रकाशन ची स्थापना त्या गरजेतून झाली. संगणकीय तंत्रज्ञान शिकवणारी मराठी पुस्तकेच केवळ प्रकाशित करायची असे ध्येय ठेवून या प्रकाशन संस्थेची स्थापना १९९९ साली झाली. नाव ठरवण्यात आले – संगणक प्रकाशन.

‘संगणक प्रकाशन’ची गाजलेली पुस्तके

ऑगस्ट २००० मध्ये, म्हणजे २२ वर्षांपूर्वी संगणक चे पहिले पुस्तक वाचकांसमोर आले. त्याचे नाव होते ‘वेब डिझायनिंग : तंत्र आणि मंत्र’. पुस्तकाचे लेखक होते माधव शिरवळकर. खरं तर २००० साली मराठीतून ‘वेब डिझायनिंग’ शिकणारांची संख्या फारच मर्यादित होती. पुस्तकाच्या १०० प्रतीही खपणार नाहीत असा अंदाज त्यावेळच्या सल्लागारांनी व्यक्त केला होता. मात्र, झाले उलटेच. पुस्तकाची पहिली आवृत्ती महिन्याभरातच संपली. पुढील सहा महिन्यांत लागोपाठ आणखी दोन आवृत्त्या संपल्या. ‘संगणक प्रकाशन’ हे नाव महाराष्ट्र भरच्या वाचकांना परिचित झाले.
‘वेब डिझायनिंग :तंत्र आणि मंत्र’ च्या पाठोपाठ ‘ईमेल आणि चॅट’, ‘काँप्युटर व्हायरस :स्वरूप आणि उपाय’, ‘फोटोशॉप :, टीप्स ॲन्ड ट्रीक्स’ , ‘१००१ सर्वोत्कृष्ट वेबसाईटस डिरेक्टरी’, ‘कोरल ड्रॉ : टीप्स आणि ट्रीक्स’ वगैरे संगणक विषयक मराठी पुस्तके एका पाठोपाठ एक याप्रमाणे संगणक प्रकाशन ने पुढील ९ वर्षांत प्रकाशित केली. या सर्व पुस्तकांचे लेखक होते माधव शिरवळकर. २०१० साली शिरवळकरांचे. ‘युनिकोड मराठी : तंत्र आणि मंत्र’ हे नवे पुस्तक. ‘संगणक प्रकाशन’ ने प्रकाशित केले, आणि डिजिटल मराठी फाँटची माहिती देणार्या त्या तंत्रविषयक उपयुक्त पुस्तकाचे उदंड स्वागत झाले. MSCIT परिक्षा घेणार्या ‘महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड’ (MKCL) ने आपल्या ५००० केंद्रांसाठी या पुस्तकाची प्रत मागवली. पुस्तक महाराष्ट्राच्या जिल्ह्याजिल्ह्यात, तालुकातालुक्यात गेले. पाठोपाठ महाराष्ट्र शासनाने या पुस्तकाला ₹५०,००० चा पुरस्कार जाहीर केला.
इ. स. १९९९ ते २०१० हा एक तपाचा काळ संगणक प्रकाशन ने तंत्रविषयक गाजलेल्या मराठी पुस्तकांच्या निर्मितीसाठी सातत्याने दिला. मराठी वृत्तपत्रांनीही या पुस्तक निर्मितीसाठी सतत प्रोत्साहन दिले.

मराठी ईबुक्स ची निर्मिती

छापिल पुस्तकांबरोबर ‘संगणक प्रकाशन’ ने गेली दोन दशके दर्जेदार ईबुक्सचीही निर्मिती केली. २००५ साली नाशिक येथील साहित्य संमेलनाच्या पुस्तक प्रदर्शनात अध्यक्ष प्रा. केशव मेश्राम यांच्या हस्ते ‘समग्र राम गणेश गडकरी साहित्य’ या ईबुक सीडीचे प्रकाशन झाले. सतरा वर्षांपूर्वी लोकांना PDF म्हणजे काय हे समजावून सांगावे लागत असे यावर आज कोणी विश्वासही ठेवणार नाही. मात्र, तरीही फक्त ₹९९ किंमतीची ‘समग्र गडकरी’ ह्या सीडीची पहिली आवृत्ती नाशिकच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात हातोहात संपली. ‘संगणक प्रकाशन’ ने पाठोपाठ लक्ष्मीबाई टिळक यांचे ‘संपूर्ण स्मृतिचित्रे’ हे ईबुक लक्ष्मीबाईंचे नातू श्री. अशोकराव टिळक यांच्या हस्ते नाशिक येथे प्रकाशित केले. महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन चे मा. विवेक सावंत यांनी नाशिकच्या त्या प्रकाशन समारंभात श्रोत्यांना ईबुकचे महत्व समजावून सांगितले. आज सर्वच जण ईबुक्स बद्दल चर्चा करतात. मात्र, ‘संगणक प्रकाशन’ ही मराठी पुस्तकांच्या ईबुक्सची निर्मिती सुरू करणाऱ्या सर्वांत जुन्या व अनुभवी संस्थांपैकी एक आहे

ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर मराठी पुस्तकांचे वितरण करणारी अधिकृत व अग्रेसर संस्था – संगणक प्रकाशन

मराठी प्रकाशक मग ते ‘मौज’ असो की ‘ग्रंथाली’ , ‘श्रीविद्या’ असो की ‘पद्मगंधा’, ‘मेनका’ असो की ‘राजहंस’, ‘रोहन’ असो की ‘युनिक फीचर्स’ वा ‘समकालिन’, जवळपास सर्वच लहानमोठ्या मराठी प्रकाशकांची पुस्तके आज ‘संगणक प्रकाशन’ ने ‘ॲमेझॉन’ व ‘फ्लिपकार्ट’ वर वितरित केली आहेत. ऑनलाईन पुस्तक विक्रीचे आधुनिक माध्यम लोकप्रिय झाले असल्याने, व संगणक प्रकाशन सारखी विश्वासार्ह-अनुभवी संस्था संपर्कासाठी उपलब्ध असल्याने आज लहानातला लहान प्रकाशक व लेखक आपली पुस्तके घेऊन ‘संगणक प्रकाशन’ कडे येतो, आणि संगणक प्रकाशन मध्ये त्याचे स्वागत होत असते.

लेखक आणि प्रकाशकांसाठी मोफत मार्गदर्शन

आज प्रिंट बुक व ईबुक वा किंडल बुक च्या पुस्तक निर्मितीसाठी लेखक व प्रकाशकांना मोफत मार्गदर्शन ‘संगणक प्रकाशन’ कडून दिले जाते. त्यासाठी ‘संगणक’ शी संपर्क साधता येईल. या संकेतस्थळाच्या Contact us लिंकवर ‘संगणक प्रकाशन’ चा पत्ता, दूरध्वनी क्रमांक, मोबाईल / व्हॉटसॲप क्रमांक, ईमेल आयडी वगैरे तपशील उपलब्ध आहे.

संगणक प्रकाशन चे व्यवस्थापन

श्री. माधव शिरवळकर हे ‘संगणक प्रकाशन’ चे प्रमुख सल्लागार असून श्री. विश्वनाथ खांदारे हे व्यवस्थापन प्रमुख आहेत. गेली सुमारे २५ वर्षे पुस्तकांच्या जगात सातत्याने कार्यरत असणाऱ्या या दोन संचालकांच्या नेतृत्वाखाली ‘संगणक’ ची संपूर्ण टीम दैनंदिन कामकाज पहात असते. अंबरनाथ, जिल्हा ठाणे येथे ‘संगणक प्रकाशन’ चे कार्यालय आहे.

लॉकडाऊन काळात वाचकांपर्यत पुस्तके पोचवण्यासाठी ‘संगणक’ च्या विशेष प्रयत्नांची दखल ‘झी न्यूज’ नेही घेतली तेव्हा…
(वाचकहो, हा व्हिडिओ आवर्जून पहा)